शहरातील खेळाडूंचे ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण.
ठाणे:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग आणि क्रीडा विभाग, ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने महाराष्ट्रातून ‘’टोकियो ऑलिम्पिक २०२०’’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या दहा खेळाडूंना महापौर नरेश गणपत म्हस्के आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा नियोजन भवन येथे स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उप महापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रियांका पाटील, उप आयुक्त मीनल पालांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे तसेच तालुका क्रीडा अधिकारी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तेजस्विनी सावंत (५० मी. रायफल शुटिंग), राही सरनोबत (पिस्तूल शूटिंग २५ मी.), प्रवीण जाधव ( आर्चरी रिव्हर्स ), चिराग शेट्टी (बॅडमिंटन पुरुष दुहेरी ), स्वरूप उन्हाळकर(पॅरा शूटिंग- १० मी.रायफल), अविनाश साबळे (अँथलेटिक्स-३००० मी स्टीपलचेस), सुयश जाधव ( पॅरा स्विमिंग) उदयन माने ( गोल्फ ), भाग्यश्री जाधव ( पॅरा अँथलेटिक्स- गोळा फेक) आणि विष्णू सरवानन ( सेलिंग लेसर सॅन्डर्ड क्लास) हे १० खेळाडू सहभागी होत आहेत. या सर्व खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा विभाग आणि क्रीडा विभाग ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने जिल्हा नियोजन भवन व दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे 'सह्यांची मोहीम'' व ''सेल्फी पॉईंट'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के म्हणाले कि, टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत महाराष्ट्रातील १० खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्त्व करणार असून या जागतिक स्पर्धेसाठी यांची निवड होणे हि अभिमानाची गोष्ट असून या सर्वच स्पर्धकांनी सुवर्ण पदक प्राप्त करावे या सर्व ठाणेकरांच्यावतीने त्यांना सदिच्छा तसेच भविष्यात ठाण्यातील खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात होवून त्यांनी यामध्ये यश मिळवावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
तसेच टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये देखील आपला सराव सुरूच ठेवला असून या सर्व खेळाडूंच्या पाठीशी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या शुभेच्छा असून या स्पर्धेत त्यांनी सुयश प्राप्त करण्याच्या सदिच्छा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या.
दरम्यान ठाणे महानपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील खेळाडू आणि पुरुष व महिला कबड्डीपट्टू यांच्यासाठी महापौर, उप महापौर तसेच इतर महापालिका पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे विशेष लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी १८ वर्षावरील महापालिकेच्या सर्व खेळाडूंचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.